लठ्ठपणावर मात करण्यासाठी नागरिकांना ओबेसिटी उपचार पध्दतीचे मार्गदर्शन
लठ्ठपणावर मात करणारे अनेक रुग्ण आले डॉक्टरांच्या भेटीला
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतात लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणा सोबत अनेक आजारांना घेऊन येतो. लठ्ठपणामुळे निर्माण होणारे विविध आजार हे सायलेंट किलर असून, यामुळे शरीर आतून कमकुवत बनते. निरोगी जीवनाचा आनंद घेण्यासाठी लठ्ठपणावर मात करणे आवश्यक आहे. यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाने सिध्द झालेली ओबेसिटी उपचार पध्दती सर्वोत्तम व अद्यावत असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ओबेसिटी तज्ञ तथा संशोधक डॉ. जयश्री तोडकर यांनी केले.
इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर लॅप्रोस्कॉपिक अँण्ड ओबेसिटी ट्रीटमेंटच्या वतीने शहरातील राजयोग हॉटेल मध्ये लठ्ठपणा आणि त्यावरील अद्यावत उपचार पध्दती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तोडकर बोलत होत्या.
पुढे डॉ. तोडकर म्हणाल्या की, लठ्ठपणामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, किडनी, लिव्हरचे आजार, हाडांची झीज, वंध्यत्व अशा शंभर आजारांचा अंतर्भाव आहे. आजारांचे मुळ कारण लठ्ठपणा असल्यास रोगाच्या मुळावर उपचार केल्यास अनेक असाध्य रोगांपासून मुक्तता मिळू शकते. लठ्ठपणा फक्त डोळ्यांना दिसणारी गोष्ट नसून, त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. वजन व उंची यांचे गुणोत्तराने लठ्ठपणा ठरत असतो. अटोक्यात असलेला लठ्ठपणा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम, आहार व औषधाने कमी होतो. मात्र प्रमाणाबाहेर गेलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी ओबेसिटी ही दुर्बिणीची शस्त्रक्रिया सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीयांमध्ये लठ्ठपणात फक्त पोट व कंबरेचा घेर वाढत असतो. यामुळे हृदय, फुफ्फुस यांच्यावर मोठा ताण निर्माण होतो. यामुळे थकवा व इतर आजार जडले जातात. लठ्ठपणाचे विविध प्रकार असून, योग्य तज्ञ डॉक्टर कडून शरीराचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपचार घेऊ शकतात. प्रत्येकाच्या शरीराची ठेव वेगळी असून, त्यावरील आहार, उपचार व व्यायाम देखील वेगळे ठरते. लठ्ठपणामुळे निर्माण होणार्या आजारातून मुक्तता मिळवून निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन ओबेसिटीचा उपचार पध्दतीचा अवलंब करण्याचे आवाहन डॉ. तोडकर यांनी केले.
आयान ग्लोबल सर्व्हिसेसच्या प्रमुख मनीषा पवार यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ओबेसिटीतज्ञ डॉ. जयश्री तोडकर त्यांनी 2005 सालापासून आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रिया देश-विदेशात यशस्वीरित्या केल्या आहेत. ओबेसिटीबद्दल वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ओपीडी आणि शिक्षण सुरू करण्याचे श्रेय देखील त्यांना जाते असल्याची माहिती दिली. तर मुंबई, पुणे सारख्या शहरात सेवा देणारे डॉ. तोडकर शहरात आल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. यावेळी महेश पवार, डॉ. प्रफुल गव्हाणे, अभिजित खोसे, डॉ. निलेश शेळके आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश जोशी यांनी केले.
ओबेसिटी उपचार पध्दतीने लठ्ठपणावर मात करुन आनंदी जीवन जगणारे जिल्ह्यातील अनेक रुग्ण डॉ. जयश्री तोडकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. वजनाची शंभरी पार केलेले रुग्ण 60 ते 70 किलो वजनावर आल्याचे प्रत्यक्ष व्यक्ती या कार्यक्रमात पहायला मिळाले. या व्यक्तींनी आपला अनुभव सांगून, या उपचार पध्दतीने आनंदी व निरोगी जीवन जगत असल्याची भावना व्यक्त केली.