एके दिवशी सकाळीच तेजसची आई माझ्याकडे आली. मला कळेनाच, की इतक्या सकाळी त्या अचानक का आल्या ते! मी त्यांना विचारण्याच्या आतच त्या चिंताग्रस्त चेहऱ्याने मला म्हणाल्या, “डॉक्टर, तेजसच्या तब्येतीचे काही तरी करा हो. लठ्ठपणामुळे त्याला शाळेत कोणत्याही क्रीडा प्रकारात भाग घेता येत नाही. खरे सांगायचे, तर अगदी रोजच्या हालचालीदेखील त्याला सहजपणे करता येत नाहीत.” मी तेजसच्या आईला धीर देऊन, चिंता करू नका असे सांगितले. थोडे बोलणे झाल्यानंतर त्या तेथून निघून गेल्या खरं; परंतु त्यांच्याशी बोलताना माझ्या मनात जे विचारांचे वादळ घोंगावू लागले ते काही थांबेना.
तेजससारखी अनेक मुले लठ्ठपणा या अतिगंभीर आजाराने ग्रासली आहेत. लठ्ठपणाला आजार म्हटल्यामुळे कदाचित तुम्हांला गोंधळून जायला होईल, परंतु दुर्दैवाने हे वास्तव आहे. लठ्ठपणा हा गंभीर आजार आहे. हा आजार शारीरिक व मानसिक असे दोन्ही प्रकारचे स्वास्थ्य बिघडवतो. त्यामुळे याचे गांभीर्य ओळखून योग्य वेळी योग्य उपचार घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजात लठ्ठपणाविषयी अनेक समज, गैरसमज आहेत. लठ्ठपणा म्हणजे ताकदवान किंवा खूप शक्ती असे नव्हे, लठ्ठपणा आणि ताकद यात गल्लत करायची नाही. म्हणूनच सर्वप्रथम लठ्ठपणा म्हणजे नेमके काय हे समजून घेणे गरजेचे आहे.
मानवी शरीराचे दोन प्रकार असतात. एक अशक्त आणि दुसरा सशक्त, अशक्त म्हणजे ज्याला आपण दुबळे शरीर म्हणतो. या प्रकारात शरीराचे वजन खूप कमी असते. सर्वसामान्य हालचाली केल्या तरी त्या त्रासदायक वाटू लागतात. दुसरा प्रकार म्हणजे सशक्त, ज्याला आपण निरोगी म्हणतो. निरोगी शरीर असणाऱ्यांच्या हालचाली या सहजपणे होताना दिसतात. अशांची मानसिक व शारीरिक अवस्थादेखील निरोगीच असते. या दोन प्रकारांनंतर नंबर येतो तो अति वजन किंवा स्थूल शरीर असणाऱ्यांचा. यालाच आपण लठ्ठपणा असे म्हणतो. याची जर व्याख्या करायची म्हटले, तर शरीरात चरबी किंवा फॅट्सचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढू लागते आणि ते शरीराला अवजड वाटू लागते त्याला लठ्ठपणा म्हणता येईल.
लक्षणे :
जिन्याच्या पायऱ्या चढताना दम लागणे, टेकडी चढताना दम लागणे, साधे चालतानादेखील दम लागणे, साध्या श्रमाने देखील दमल्यासारखे होणे; कुठलीही गोष्ट करण्याचा आळस येणे, खाली पडलेली वस्तू पटकन उचलता न येणे, वाकून करावयाच्या कामात अडचणी येणे अशी लक्षणे जाणवल्यास समजावे की, शरीराला वजन सहन होत नाही. याशिवाय पोट सुटणे, मान मोठी दिसणे, कंबरेचा भाग वाढत जाणे, गाल गोबरे होणे अशी लक्षणे ठळक स्वरूपात दिसतात. हाच लठ्ठपणा जर लहान वयात असेल तर सांधेदुखी, पाय दुखणे, ताकद नसणे अशी लक्षणे सुरूवातीपासूनच जाणवतात.
आजार वाढतोय हे कसे ओळखाल?
लठ्ठपणाच्या वरील लक्षणांमध्ये वाढ होत जाते. याशिवाय सतत खा खा सुटणे, पोट वाढत जाणे, कंटाळा वाढत जाणे, सतत गोड खाण्याची इच्छा होणे, खूप जास्त भूक लागणे, मान, त्वचेच्या घड्यांमध्ये, जांघेमध्ये, छातीखाली काळवंडणे, छोट्या छोट्या चामखिळी तयार होणे असे दिसून येते. याचाच असा अर्थ होतो की, धोक्याची घंटा वाजली आहे आणि धोका टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. लहान वयात येणारा लठ्ठपणा हा मोठे झाल्यावरही तसाच राहिला, तर त्रास सुरूच राहतो किंबहुना त्रास वाढतच जातो. त्यामुळेच लठ्ठपणा हा आजार दुर्लक्ष करण्यासारखा नाही. या आजारामुळे शंभरहून अधिक गंभीर आजार होतात. उदाहरण द्यायचे झाले तर हृदयाचा आकार वाढणे, ताकद कमी होणे, पाठदुखी, उच्च रक्तदाब, मधुमेह, विविध हार्मोन्समधील बदल, वंध्यत्व, थायरॉईड, फुप्फुसावर दाब येऊन दम्यासारखा आजार होऊ शकतो. लिव्हरवर अतिरिक्त दाब येऊन ते निकामी होऊ शकते. हे सर्व दुष्परिणाम सविस्तरपणे पुढील लेखात पाहू या. (क्रमशः)